विवेकानंद आश्रम परिसराला आज भेट देतांना प.पू. शुकदास महाराजांची आठवण झाली. त्यांच्या सत्संगाची जी अल्प कृपा भाग्याने मिळाली ती आठवून व त्यापेक्षाही त्यांच्या कार्याचा वसा पुढेही तितक्याच नेटाने, परिश्रमाने नेणारी कार्यकर्ता मंडळी सक्रीय आहे. हे पाहून समाधान वाटले. प.पू. शुकदास महाराजांच्या मानवसेवेच्या सर्व कार्याचा पाया आध्यात्मदृष्टी,देशभक्ती,सेवा व समर्पण या चतूःसूत्रीने घातला गेला आहे. असे उदगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विवेकानंद आश्रमात सदिच्छा भेट प्रसंगी कार्यकारी मंडळातील सदस्यांसोबत चर्चा करतांना काढले. दि. १८ सोमवार रोजी सकाळी १०.३० वाजता विवेकानंद आश्रमाच्या प्रवेशव्दारावर त्यांचे आगमन झाले. याप्रसंगी संस्थेच्या सर्व शैक्षणिक विभागांना त्यांनी भेट दिली. हरिहर तीर्थावरील भगवान बालाजी मंदिर,भगवान शिव मंदिर व गोशाळेला त्यांनी भेट दिली. आश्रमाच्या मुख्य परिसरातील प.पू.शुकदास महाराजांच्या समाधीचे त्यांनी पूजन केले. आश्रमातील सर्वांचा एकमेळ असाच राहून कार्याचा उत्तरोत्तर उत्कर्ष व्हावा ही माझी शुभकामना आहे. ग्रामविकासात कार्य करतांना शेतीला पोषक असलेल्या गायी, गुरांचा सांभाळ करतांना गायींच्या प्रादेशिक वाणांची निवड करावी व जोपासना करावी. गावातील जनतेमध्ये सामंजस्य आणि एकोपा निर्माण झाल्यास प्रगतीची वाट सुकर होते असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. शेतीची मशागत करतांना यंत्रसामुग्रीचा उपयोग होत असल्यामुळे पिकांना उपयोगी किटकांचा नायनाट होतो. याउलट बैलजोडीचा वापर केल्यास किटकांची जोपासना होते व जमिनीचा कस कायम राहतो. पुर्वीच्या काळी गायीचे पालन केवळ शेण व मूत्र यांच्यापासून खत निर्मितीकरीता प्रामुख्याने होत होता. तसेच गायींच्या दुधाचा उपयोग केवळ घरगुती आहारासाठी होत असे. आज गायीच्या दुधाचे व्यापारीकरण झाल्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गोधनाचा उपयोग शेतीला पूरक होणे गरजेचे असल्याचे त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. यावेळी विवेकानंद आश्रमाच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विभाग संघचालक चित्तरंजन राठी, प्रांत सहकार्यवाह राजेंद्र उमाळे, जिल्हा संघचालक शांतीलाल बोराळकर,प्रांत धर्मजागरण प्रमुख पुरूषोत्तम दिवटे,विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी,उपाध्यक्ष अशोक पाध्ये,अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते,विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर,नारायण भारस्कर,शशीकांत आप्पा बेंदाडे तथा आदि उपस्थित होते.

प.पू. शुकदास महाराजांच्या साधनेतून सेवाकार्य शक्य
विवेकानंद आश्रमाचे सेवाकार्य प.पू. शुकदास महाराजांच्या सत्व व साधनेतून शक्य होवू शकले आहे. संस्थेतील ही सत्वशीलता व साधना टिकून राहणे आपली जबाबदारी असल्याचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी यावेळी विश्वस्तांना बोलताना सांगीतले.