विवेकानंद आश्रम मानव कल्याणाच्या विविध उपक्रमांव्दारे मानवाच्या उत्कर्षासाठी झटणारी संस्था आहे. या उपक्रमांसोबतच मुक्या जीवांच्या रक्षणासाठी त्यांच्या संगोपनासाठी सुध्दा संस्था गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहे. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेव्दारा गोशाळा चालविली जात आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे हिरवा चारा उपलब्ध नाही. सोयाबीनचा पेरा कमी झाल्यामुळे कुटार उपलब्ध नाही. त्यामुळे गाई वासरांच्या चा-यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विवेकानंद आश्रमाच्या गोशाळेसाठी कळंबेश्वर येथील दानशूर शेतकरी गजानन आनंदा अवचार यांनी स्वतःच्या शेतातील एक ट्राली कुटार दान दिले. त्यांचा सत्कार करतांना विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी. मालपाणी यांनी समाजातील दानशूरांनी गायींसाठी चारा दान करण्याचे आवाहन केले आहे. एप्रिल व मे महिना गुरांच्या संगोपनासाठी अत्यंत जोखमीचा असून चारा व पाणी टंचाई सोबत वाढते तापमान यामुळे पशूपालकांमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहे. म्हणून अनेक शेतकरी आपल्या गायी,गुरांना विवेकानंद आश्रमाच्या गोशाळेत पाठवित आहेत. असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. विवेकानंद आश्रमात गेल्या आठवडयातच गुरांच्या तपासणीसाठी भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. पशू व मस्त्य विद्यापीठ नागपूर व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशू विज्ञान संस्था अकोला यांच्या वतीने गुरांची तपासणी करण्यात आली होती. परीसरातील व गोशाळेतील असंख्य गायी, गुरांची तपासणी करण्यात आली होती. समाजातील संवेदनशील,दानशूर दात्यांनी गायी,गुरांच्या चा-यासाठी मदत केल्यास ही गोसेवा अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होणार असल्याचेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले. याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सचिव संतोष गोरे,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते तथा पदाधिकारी उपस्थित होते.

अनुदानाशिवाय गोपालन
कर्मयोगी प.पू.शुकदास महाराजांनी मुक्या जनावरांच्या संगोपनासाठी सुरू केलेल्या या गोशाळेत जवळपास १५० गाई गुरांचा संभाळ केल्या जात आहे. शासनाच्या कोणत्याही अनुदानाशिवाय तसेच कोणत्याही मदतीविना एवढया जनावरांचा संभाळ करणे अतिशय कठिण काम आहे.

जन्माष्टमीला गोपालकांचा मेळावा
कर्मयोगी संत प पू शुकदास महाराजांनी १९८८ मध्ये विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेची स्थापना केली. परिसरातील नागरिकांनी गो संगोपन करावे व मुलांना शुद्ध दूध मिळावे यासाठी भव्य प्रमाणात गो व गोपालकांचा मेळावा दरवर्षी विवेकानंद आश्रमात जन्माष्टमीला संपन्न होत असतो.

समाजातील दानशूरांनी पुढाकार घेण्याची गरज
यावर्षी पावसाची कमी झाल्यामुळे गो संगोपन करतांना अनेक अडचणी येत आहे. गाई,गुरांसाठी चारा व्यवस्था करतांना कमालीची कसरत करावी लागत आहे. विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेत विविध प्रजातीच्या गाईंचे संगोपन केल्या जाते. विवेकानंद आश्रमाच्या गो शाळेतील गाई,गुरांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे.