हिवरा आश्रम – महाराष्ट्रात युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या नावाने केवळ हिवरा आश्रम येथेच साजरा होणार्या विवेकानंद जन्मोत्सवास येत्या 25 जानेवारी रोजी सुरुवात होणार असून, रविवार (ता.27) भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 25 ते 27 जानेवारी असे तीनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या महाप्रसाद वितरण सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती विवेकानंद आरमाचे सचिव संतोष गोरे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांनी ग्रामीण भागात विवेकानंदांच्या नावाने साजरा होणार्या या उत्सवाची सुरुवात केली असून, राज्यात केवळ हिवरा आश्रम येथेच इतक्या भव्य प्रमाणात हा जन्मोत्सव साजरा होता. यानिमित्त 25 ते 27 जानेवारी रोजी भरगच्च सांस्कृतिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 25 जानेवारी रोजी पहाटे 7 ते 8.30 ह.भ.प. थुट्टेशास्त्री महाराज यांचे प्रार्थना व व्याख्या, 8.30 ते 9.30 विवेकानंद आश्रमाच्या संगीत विभागाच्यावतीने अनुभूती गायन, 9.30 ते 10.30 हभप येवलेशास्त्री महाराज यांचे प्रवचन, सकाळी 10.30 ते 12 वाजता वेदांताचार्य, विद्यावाचस्पती गजाननदादा शास्त्री यांचे व्याख्यान व त्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजता हभप महंत उद्धव महाराज मंडलिक यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी 2 ते 5 कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या आसनस्थ मूर्तीची शेकडो भजनी मंडळांच्या साथीने लेझिम, ढोल, मृदंगांच्या गजरात भव्य शोभायात्रा निघणार आहे.
दुपारी 5 ते 6.30 वाजता 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध विचारवंत डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या व्याख्यान सायंकाळी 6.30 ते 8 वाजता प्रख्यात वक्ते विवेक घळसासी यांचे व्याख्यान होईल. तर रात्री 8 ते 9 वाजता हभप वैराग्यमूर्ती पोपट महाराज यांचे कीर्तन होईल. रात्री 9 ते 10 सप्तखंजेरी वादक, राष्ट्रीय कीर्तनकार संदीपपाल महाराज गीते यांचे कीर्तन पार पडणार आहे. 26 जानेवारी रोजी देखील विविध कार्यक्रम होणार आहेत. 27 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 5 भव्य महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या महाप्रसादास अडीच लाख भाविकांची उपस्थिती गृहीत धरण्यात आली आहे. दुपारी 5 ते 6.15 वाजता मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य डॉ.राजशेखर सोलापूरे यांचे व्याख्यान, 6.15 ते 7.30 प्रख्यात विचारवंत विवेक घळसासी यांचे व्याख्यान, तर सायकाळी 7.30 ते 8 वाजता प्रार्थना, शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचा पूजन सोहळा पार पडणार आहे. रात्री 8 ते 9 हभप जगन्नाथ महाराज पाटील यांचे कीर्तन, 9 ते 9.30 हभप उद्धवराव गाडेकर महाराज यांचे कीर्तन होणार आहे. रात्री साडेनऊनंतर झीटीव्हीफेम स्वरसम्राट रामानंद उगले यांच्या शाहिरीच्या कार्यक्रमाने विवेकानंद जन्मोत्सवाची सांगता होणार आहे.
विवेकानंद जन्मोत्सव हा दैनंदिन विविध त्रासांनी ग्रस्त असलेल्या मानवी मनाला प्रफुल्लित करुन त्याला जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे काम करतो. विवेक आनंदाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी सर्वांनी आवर्जून यावे. – आर.बी.मालपाणी, अध्यक्ष विवेकानंद आश्रम
Recent Comments