हिवरा आश्रम – भगवान श्रीकृष्ण मानवी जीवनाला व्यापून आहे. अगदी बालकृष्ण ते युगंधरकृष्ण यांचे जगण्याच्या प्रत्येक वळणावर मार्गदर्शन करणारे तत्त्वज्ञान भगवद्गीतेत समाविष्ट आहे. गीतेतील त्यांचा उपदेश समतेचा आहे व समतेमुळेच सामाजिक एकोपा अबाधित राहू शकतो असे उद्गार राज्याचे पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विवेकानंद आश्रमात आयोजित केलेल्या गोकुळाष्टळी उत्सवात बोलतांना व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थानी विवेकानंद विश्‍वत दादासाहेब मानघाले तर प्रमुख पाहूणे आमदार डॉ.संजय रायमूलकर, हभप गजाननदादा शास्त्री पवार महाराज होते. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट गायीचे संवर्धन करणार्‍या गोपालकांचा बक्षिसे देवून सत्कार करण्यात आला.

शुकदास महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घवून हरिहरतीर्थावर आयोजित गायीचा मेळावा व प्रदर्शनाला भेट देऊन स्पर्धेत सहभागी झालेल्या गायीची व आश्रमाच्या गोशाळेची त्यांनी पाहणी केली. विवेकानंद आश्रमाची गोशाळा ही शेतकर्‍यांसाठी प्रेरणादायी स्थळ आहे. या गोशाळेतील जनावरांच्या सोयी, सुविधा, अद्यावत दवाखाना, संवर्धनासाठी एक कोटी रुपयाचे अनुदान देणार असल्याची घोषणा मंत्री खोतकर यांनी केली.

गजाननदादा शास्त्री पवार यांनी या प्रकारचा आगळा वेगळा उत्सव संपन्न करणारे विवेकानंद आश्रम समाजाचे दिशादर्शक आहे. मानवी कल्याणासाठी आवश्यक असलेली सर्व दालने समाजासाठी उपलब्ध करुन देण्याचे काम शुकदास महाराजांनी केले असल्याचे विचार त्यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर जि.प.सदस्य आशिष रहाटे, डॉ.पसरटे, तहसीलदर संतोष काकडे, विनायकराव सरनाईक, दत्ताभाऊ खरात, पंडित भुतेकर, उद्ववराव काळे, आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, अशोक पाध्ये, अशोक थोरहाते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष गोरे यांनी तर आभार अशोक पाध्ये यांनी मानले.