कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी स्वामी विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांपासून प्रेरणा घेवून बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा बु ॥ या छोट्याशा खेड्यात 14 जानेवारी 1965 रोजी विवेकानंद आश्रमाची स्थापना केली. विवेकानंदांच्या ओजस्वी विचारांना पुस्तका पुरते मर्यादित न ठेवता विवेकानंदांच्या विचारांना खर्‍या अर्थाने कृतीची जोड दिली. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रम स्थापना करुन उजाड माळरानावर विवेकानंद आश्रमाच्या रुपाने स्वर्ग निर्माण केला. कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी वयाच्या 14 व्या वर्षांपासूनच समाजसेवेचा वसा घेतला. मानवसेवा हीच ईश्‍वर सेवा, तोच खरा धर्म व तेच खरे आध्यात्मीक जीवन, हे जीवनध्येय ठरविले. दारिद्य्र नारायणाची सेवा हीच खरी परमेश्‍वराची पूजा हा विचार महाराजांच्या जीवन कार्याचा आधार बनला.

ज्या मी देवाचा आहे उपसाक । करुनी ओळख देतो त्याची ॥
या इकडे तुम्ही पहा तो नयनी । नटला रुपानी दु:खीतांच्या ॥
गरीब अनाथ अपंग दलित । तोचि हा पतीत झाला अज्ञ ॥
शुकदास म्हणे हेचि माझे देव । अर्पिला मी जीव त्यांच्यासाठी

विवेकानंद आश्रमाचे मानवाच्या जीवनाच्या सर्व अंगाला स्पर्श करणारे विविध सेवाभावी उपक्रम व सेवा कार्य अखिल समाजोन्नतीसाठी आहे.
भौतिक विकास हा अध्यात्माच्या पायावर उभा करुन भूतलावर स्वर्ग कसा निर्माण होऊ शकते हे प.पू.शुकदास महाराजांनी विवेकानंद आश्रमाचे माध्यामातून समाजाला दाखवून दिली. विवेकानंद आश्रम हे असे एक तीर्थस्थळ आहे की, जिथे माणसाच्या मनाचा मळ धुतला जावून त्याचा विवेक जागृत होतो. धर्म, पंथ, भेद विसरायला लावणारा विवेकानंद आश्रमाचा परिसर मनाला भावणारा आहे. जणूकाही विवेकानंद आश्रम ही सामाजिक विकासाची प्रयोगशाला तसचे धर्माचे यर्थाथरुप स्पष्ट करणारी धर्म शाळा आहे. तीर्थक्षेत्र म्हणून विवेकानंद आश्रमाच्या हरिहर तीर्थक्षेत्रास विवेकाची किनार आहे. हरिहर तीर्थक्षेत्रावरील भगवान बालाजी व भगवान शिव ही दोन्ही मंदिरे वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे. विवेकानंद आश्रम म्हणजे विज्ञान आणि अध्यात्माचा सुरेख संगम आहे. विवेकानंद आश्रम म्हणजे मानवसेवेचा दिपस्तंभ होय.

आश्रमाचे ग्रामीण भागातील आरोग्य कार्य उल्लेखनीय
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी सव्वा कोटीहून अधिक रुग्णांना व्याधीमुक्त केले आहे. विवेकानंद आश्रमाद्वारे ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य समस्या दूर होण्याच्या दृष्टीने विविध भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या आरोग्य शिबिरामध्ये नामवंत डॉक्टर्स आपली सेवा देतात. आरोग्य शिबिरात गरजू, गरीब रुग्णांना मोफत औषधींचे वाटप केले जाते. गरीब रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेचा खर्च विवेकानंद आश्रम उचलते. विवेकानंद आश्रमद्वारा आयोजित आरोग्य शिबिराचा दरवर्षी सुमारे दहा हजार ते पंधरा हजार रुग्ण बांधव लाभ घेतात.

ग्रामीण रुग्णालयाचा 40 खेड्यांना होईल लाभ
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांनी शेवटच्या श्‍वासापर्यंत रुग्णसेवेला प्राधान्य दिले. प.पू.शुकदास महाराजांच्या आरोग्य सेवेची दखल घेत महाराष्ट्र शासनाने हिवरा आश्रम येथे विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालयास मंजूरी दिली. हिवरा आश्रम येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम प्रगती पथावर असून, लवकरच हे ग्रामीण रुग्णालय जनतेच्या सेवेसाठी सुरु होईल. ग्रामीण रुग्णालयांसाठी विवेकानंद आश्रमाने चार कोटी रुपये किंमतीची जागा उपलब्ध करुन दिली असून, ह्या ग्रामीण रुग्णालयाच्या लाभ जवळपास चाळीस ते पन्नास खेड्यातील रुग्ण बांधवांना होणार आहे.

विवेकानंद आश्रमाचे शैक्षणिक कार्य
बोध आणि शोध म्हणजे शिक्षण होय असे शिक्षणाबाबत शुकदास महाराजांचे विचार विद्यार्थ्याच्या जिज्ञासा, शोध वृत्तीला चालना देण्यासाठी प्रेरक ठरतात. शिक्षण हा विकासाचा पाया आहे. ग्रामीण भागातील होतकरु, गरीब, हुशार विद्यार्थ्यांना कमी दरात शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी विवेकानंद आश्रमद्वारे विवेकानंद ज्ञानपीठ, विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, निवासी अपंग विद्यालय, निवासी कर्णबधिर विद्यालय, विवेकानंद विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नामांकित मुलांची इंग्रजी शाळा सुरु करण्यात आली आहे. विवेकानंद आश्रमाच्या वसतिगृहात सुमारे पाच ते सहा हजार मुले-मुली निवासी आहे. विद्यार्थ्यांच्या मनात संस्काराची बीजे अंकुरीत होवून देशाला चारित्र्यसंपन्न युवक तयार करण्याचे काम आश्रमाच्या शैक्षणिक संस्थेतून होत आहे.

कृषी कार्य शेतकरी बांधवांसाठी प्रेरणादायी
भारत हा कृषी प्रधान देश आहे. विवेकानंद आश्रमद्वारे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होण्यासाठी विविध कृषी उपक्रम राबविले जातात. यामध्ये पशुसंवर्धन, दुध चारा विकास प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प, विज्ञान शेती, कृषी मेळाव्यांचे आयोजन, कृषीप्रदशने, कृषी चर्चासत्रे मोठ्या प्रमाणात राबविले जातात.

विवेकानंद आश्रमाचे सामाजिक कार्य
वृद्ध, निराधार व्यक्तींना मायेची उब मिळावी, त्यांना सन्मानाने, ताठ मानेने जागता यावे यासाठी विवेकानंद आश्रमाद्वारे वानप्रस्थाश्रम चालविले जाते. समाजातील अंधश्रद्धा, हुंडाप्रथा निर्मुलन करण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचे काम करीत असतात. याशिवाय, साक्षरता, पर्यावरण रक्षण, संवर्धन वृक्षारोपण इत्यादी उपक्रम विवेकानंद आश्रमाद्वारे राबविले जातात.

विवेकानंद जयंत्री व भव्य महाप्रसाद
विवेकानंद आश्रमामध्ये पौष वद्य पंचमी ते सप्तमी या दरम्यान विवेकानंदांचा जन्मोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणार्‍या या महोत्सवामध्ये नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्यात, गायक यांचे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. शेवटच्या दिवशी देशभरात आलेल्या सुमारे तीन ते चार लाख भाविकांना चाळीस एकराच्या शेतात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने गव्हाची पुरी, वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात येतो.

श्रीनिवास, विवेकानंद नगर हिवरा आश्रम ता. मेहकर, जि. बुलडाणा