विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि आदर्श व्यक्तिमत्वाचा पाया रचला जातो. शिक्षणाने माणसाचे विचार प्रगल्भ होतात आणि प्रगल्भ विचारातून नवनिर्मिती होत असते. शिक्षणामुळे माणसाचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षणात वर्तनात परिवर्तन करण्याची ताकद असल्याचे विचार जिल्हा परिषद बुलडाणाचे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद विद्या मंदिरात दहावी,बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा मार्गदर्शन प्रसंगी गुरूवारी ता. ७ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद,कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रा.कैलास भिसडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिकचे सुभाष व-हाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, पुरूषोत्तम दिवटे, ज्ञानपीठाचे प्राचार्य निवृत्ती शिंदे, उपप्राचार्य अशोक गि-हे, पर्यवेक्षक देवेंद्र मोरे, आत्माराम जामकर तथा आदि उपस्थित होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, विवेकानंद आश्रमात प्रवेश करता क्षणीच आश्रम परिसराचा निटनिटकेपणा,स्वच्छता व सेवाभावाचे दर्शन होते. विवेकानंद आश्रमाचा सेवाभावामध्ये समाजहित समावले आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करतांना वाचन, लिखान व सरावाला प्राध्यान्य द्यावे. वाचून एखादा विषय लक्षात राहत नसेल तर लिखान करा. सरावा केल्याने यश प्राप्त होते. स्वतः कृती करा. शिक्षकाकडून प्रयोगाव्दारे शिकून घ्या. विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीचे भांडवल न करता जिद्द,चिकाटी व ध्येयाशी प्रामाणिक रहावे असेही ते पुढे बोलतांना म्हणाले. यावेळी विवेकानंद विद्या मंदिराचे माजी मुख्याध्यापक अनाजी सिरसाट यांचे शिक्षणाधिकारी डॉ. श्रीराम पानझाडे यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षक संजय भारती यांनी केले