साधारण ९० च्या दशकामधील घटना आहे. त्यावेळी हिवरा आश्रम परिसरात विद्युत लाईनचे नेहमी लोडशेडींग असायचे. गर्मीच्या दिवसात पू. महाराजश्री गच्चीवर रात्री झोपायला जात असत. महाराजश्रींच्या पलंगाच्या आजूबाजूने सर्व मंडळी झोपलेली असायची. सकाळी उठून महाराजश्री मॉर्निंग वॉक ला जायचे. त्यांचे सोबत स्व. आबासाहेब थोरहाते, शे. ना. दळवी गुरूजी, भारस्कर साहेब, बाळासाहेब धाडकर, अशोकभाऊ थोरहाते ही सर्व मंडळी असायची.
त्यावर्षी पाऊस कमी झालेला होता. दुष्काळ सदृष्य परिस्थिती होती. एके दिवशी सकाळी उठल्यानंतर सहज महाराजश्रींनी कोराडी धरणाच्या दिशेने नजर फिरवली. कोराडीचे पाणी खुप कमी झालेले होते. महाराजश्रींना चिंता वाटतच होती. कोराडीकडे बघत असतांनाच महाराजश्रींची नजर कोराडी मधे असलेल्या भूभागावर पडली. सर्व बाजूंनी पाणी आणि मधेच ही जमीन तरी कसली असा विचार त्यांच्या मनात आला. महाराजश्री लगेच आबासाहेबांना बोलले, ”आरे आबा! मी इकडं मॉर्निंग वाक करतो. पण तू, दळवी गुरूजी अन् अशोक आज शेवग्याकडं (शेवगा जहागीर) फिरायला जा. ती पाण्यात नेमकी जमीन कोणती? ती पाहून या.” महाराजश्रींनी आदेश दिल्यामुळे मंडळी शेवग्याकडे निघाली. तिथपर्यंतचा प्रवास आश्रमाच्या गाडीने केला. संबंधित स्थळाची माहिती घेऊन मंडळी महाराजश्रींकडे परतले. महाराजश्रींना आबासाहेबांनी सांगितले, ”ते जुनं शेवगा आहे. कोराडी नदीच्या काठावरचं. कोराडीवर धरण झाल्यानं गावाचं पुनर्वसन वर उंच भागात झालं. ही जमीत पाण्यात गेली. यावर्षी पाऊस कमी झाल्यानं धरणाला पाणी कमी आलं म्हणून ती जमीन उघडी पडली.” महाराजश्रींनी अंदाजे क्षेत्रफळ विचारले. अशोक भाऊंनी ‘अंदाजे सहा एकर असावे.’ असे सांगितले. लगेच महाराजश्रींनी पुढचा आदेश दिला, ”आजच ही जमीन शासनाकडून घेण्यासाथीचा प्रस्ताव तयार करा. आणि कामाला लागा.” पाण्यात बुडालेल्या जमीनीला महाराजश्री का मागत आहेत कोणालाच कळत नव्हते. त्यावेळचे आश्रमाचे सचिव श्री.द. ना. धाडकर साहेब व श्री.स. ज. खाकरे गुरूजींनी अचूक प्रस्ताव बनवला. त्याला तेथील ग्रामपंचायतचे ठराव, नाहरत सर्व जोडले. आबासाहेबांनी प्रस्ताव मंजूर करून आणण्याची पुढची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. त्यावेळी महाराजश्रींवर नितांत श्रध्दा असलेले अकोल्याचे मा. श्री. गुलाबरावजी गावंडे हे क्रीडा मंत्री होते. त्यांनी ही जमीन शासनाकडून विवेकानंद आश्रमाला मिळवून देण्यासाठी विशेष सहकार्य केले. महाराष्ट्र शासनाने दि. २७ मार्च २००१ रोजी महाराष्ट्र शासनाने सहा एकर क्षेत्रफळ असलेली चहूबाजूंनी पाणी असलेली ही जमीन (बेट) शासकीय नियमानुसार विवेकानंद आश्रमास देण्यात दिली. सोबत कोराडी प्रकल्पामध्ये नौकाविहाराची परवानगीही दिली.
त्यावेळी कोराडी प्रकल्पात जलसाठा कमी होता. जलसाठा वाढल्यास त्या जमीनीवर काम करता येणार नाही. असे महाराजश्रींना जाणवले. आणि त्यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती. पू. महाराजश्रींनी संस्थेच्या पदाधिका-यांना बोलावले व सांगीतले, ‘‘यावर्षी दुष्काळ आहे. गावातल्या लोकांना रोजगाराची गरज आहे. धरणात पाणी कमी आहे. ट्रॅक्टर्स भाडयाने सांगा. जेसीबी सांगा. आणि धरणातील गाळ आश्रमाच्या शेतात नेऊन टाका. मुरूम, दगड बेटावर नेऊन बेटाची उंची ४० फुटाच्या वर वाढेल एवढा भराव टाका. चोहोबाजूंनी दगडाचे पिचींग करा. जेणेकरून पावसाळयात भराव खचणार नाही. यानिमित्तानं लोकांना रोजगारही मिळेल व बेटाचे कामही पूर्ण होईल. तिथे आपल्याला विवेकानंद स्मारक बनवायचं आहे. कामाला लागा.”
महाराजश्रींच्या आदेशानुसार आश्रमाची यंत्रणा कामाला लागली. सतत एक महिना रात्रंदिवस काम सुरू होते. आता त्या जमीनीला आकर्षक बेटाचा आकार आला होता. पू. महाराजश्रींनी त्या बेटाची पाहणी केली. ह्या बेटाचा आकार कासवासारखा झाला होता. कासव हा विपरीत परिस्थितीत आपले डोके व चारी पाय पाठीवर असलेल्या मजबूत कवचात लपून ठेवतो. पंचइंद्रियांवर ताबा मिळविण्याचे ते प्रतीक आहे.
तयार झालेल्या ह्या बेटावर विवेकानंदांची मूर्ती स्थापन करण्यात आली. संस्थेकडे जसजसा निधी उपलब्ध होत गेला तसतसा बेटावरील विकास कामांचा वेग वाढत गेला. चहूबाजूंनी सिमेंट, दगडाची सुरक्षा भिंत बांधण्यात आली. नावेसाठी थांबा बनविण्यात आले. बेटावर जाण्यासाठी पाय-या बांधण्यात आल्या. वेगवेगळी वृक्षवेली लावण्यात आली. भव्य पामवृक्ष लावण्यात आले. पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली.
जानेवारी २०१७ मध्ये पू. महाराजश्रींनी भव्य दिव्य अशी २० फुट उंचीची स्वामी विवेकानंदांची प्रतिमा ह्या विवेकानंद स्मारकावर स्थापण्याचे व विधीवत प्राणप्रतिष्ठा करण्याचे मनोमन योजले. हा एक ऐतिहासिक सोहळा विवेकानंद आश्रमाच्या इतिहासात होवून गेला. पू. महाराजश्रींच्या दर्शनासाठी येणा-या काही भाविकांना पू. महाराजश्रींनी सांगीतले, ”आपली यात्रा १७, १८, १९ जानेवारीला आहे. १७ तारखेला तुमच्या हातून विवेकानंद स्मारकावर स्वामीजींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जोडीनं ह्या विधीसाठी हजर राहा.” पू. महाराजश्रींच्या मनातील प्लॅनिंग कोणालाच कळत नव्हते. पण एक जगावेगळा व सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा ऐतिहासिक सोहळा पू. महाराजश्रींना पार पाडायचा होता. पू. महाराजश्रींनी अशा १४ जोडप्यांना प्राणप्रतिष्ठा विधीसाठी निमंत्रीत केले. चौदाही जोडप्यांना हे माहिती नव्हतं अजून पूजेसाठी कोणकोण येत आहे. मूर्तीजापूरचे विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त श्री. प्रशांतजी हजारी यांना पू. महाराजश्रींनी बोलवून घेतले. आणि सांगीतले, ”अकोल्याचे कलेक्टर जी. श्रीकांत साहेब हे तरूण आहेत व स्वामी विवेकानंद तरूणांचेच आदर्श आहेत. तुम्ही जी. श्रीकांत साहेबांना भेटा. त्यांना १७ जानेवारीला स्वामी विवेकानंदांच्या भव्य मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयासाठी सपत्नीक निमंत्रीत करा. विवेकानंद आश्रमाचे कार्यकर्ते व तुमचे मित्र मोहम्मद इब्राहिम अली यांनाही सपत्नीक निमंत्रीत करा.” त्याप्रमाणे श्री. प्रशांतजी हजारी यांनी पाहूण्यांना निमंत्रीत केले. या सोहळ्याचे विधीवत पौराहित्य करण्याची जबाबदारी पू. महाराजश्रींनी खास मेहकरचे श्री. दत्ता महाराज जोशी यांच्यावर टाकली. पर्यटकांना बेटावर जाण्यासाठी राजस्थानवरून दीड लाख रूपये किमतीची खास बोट विकत आणण्यात आली. ही जबाबदारी श्री. अशोकभाऊंनी पार पाडली.
तो ऐतिहासिक दिवस उजाडला. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक पाध्ये साहेब, अशोकभाऊ थोरहाते, सचिव संतोष गोरे सर, विश्वस्त प्रशांतजी हजारी व स्वतः मी असे आम्ही सर्व ह्या सोहळ्याच्या तयारीला लागलो. पू. महाराजश्रींनी चौदा जोडप्यांसाठी पूजेला बसण्याची व्यवस्था करायला सांगीतली. आम्हाला कोणालाच कळत नव्हतं की नेमका पूजा विधी आहे तरी कोणाच्या हस्ते! सकाळी ९ वाजता जी. श्रीकांत साहेब विवेकानंद आश्रमात पोहचले. साहेबांना विवेकानंद आश्रमाचा सर्व परिसर दाखवून बेटावर विवेकानंद स्मारका पर्यंत घेवून जाण्याची जबाबदारी पू. महाराजश्रींनी श्री. प्रशांत हजारी व माझ्यावर टाकली. आम्ही जी. श्रीकांत साहेबांना आश्रमाचा सर्व परिसर दाखवून पू. महाराजश्रींच्या आशीर्वादासाठी घेवून गेलो. तेथे पू. महाराजश्रींनी साहेबांचा यथोचित सन्मान केला. नंतर आम्ही साहेबांना घेवून मंगलधामापर्यंत गाडीने गेलो. तेथून समोरचा प्रवास बोटीने केला. विवेकानंद स्मारकावर पोहचताच तेथे श्री. अशोक पाध्ये साहेबांनी जी. श्रीकांत साहेबांचे स्वागत केले. भव्य शामियाना लावण्यात आला होता. शामियाण्याच्या मध्यभागी चौदा जोडप्यांसाठी पूजेचे सर्व साहित्य मांडण्यात आले होते. तेंव्हा सर्वांना कळालं की उपस्थित चौदाही जोडप्यांच्या शुभहस्ते हा पूजन सोहळा पार पडणार आहे आणि ‘ही चौदाही जोडपी विविध जाती धर्मांची आहेत.’ हा एक आदर्श पू. महाराजश्रींनी उभा केला होता. सामाजिक ऐक्याचा संदेश पू. महाराजश्रींना यानिमित्ताने समाजाला द्यायचा होता. या जोडप्यांमध्ये १) ब्राह्मण, २) मुस्लीम ३) मराठा ४) बौध्द ५) धनगर ६) बंजारा ७) वंजारी ८) गोसावी ९) पारधी १०) चांभार ११) कोळी १२) आदिवासी १३) लिंगायत १४) मातंग ह्या सर्व वेगवगळया जाती धर्मांच्या जोडप्यांचा समावेश होता. किती अद्भूत! अकल्पनीय हा सोहळा! ‘अखिल जगताला मानवतेचा संदेश देणा-या योध्दा संन्याशाच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पू. महाराजश्रींनी सर्वांना एकत्रित आणून मानवतेचा संदेशच दिला होता.’ उपस्थित जी. श्रीकांत साहेबांसह चौदा जोडप्यांचा हस्ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीवत मोठया थाटात संपन्न झाला. हजारो भाविकांना या ऐतिहासीक सोहळयाचे साक्षीदार होता आले. सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा हा अद्भूत सोहळा संपन्न झाला.
आज या ठिकाणचा परिसर अतिशय रमणीय झालेला आहे. पर्यटकांची संख्याही वाढत आहे. पू. महाराजश्रींच्या दिव्य कल्पनेतून साकारलेला हा, ‘स्टॅच्यू ऑफ ह्युमिनीटी’ येणा-या पिढीला सदैव सेवेसाठी प्रेरणा देत राहिल यात शंका नाही!
आत्मानंद थोरहाते
विवेकानंद आश्रम
मो. 9767897309
(लेखक हे विवेकानंद आश्रमाचे सहसचिव तथा लेखक आहे.)
Recent Comments