हिवरा आश्रम – येथे 25 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजित विवेकानंद जयंती महोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आली आहे. जवळपास दोन लाख भाविकांच्या स्वागतासाठी विवेकानंद नगरी सज्ज झाली आहे. तीनही दिवस यानिमित्त धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. शेवटच्या दिवशी 40 एकराच्या विस्तीर्ण शेतात 200 क्विंटल गहू पुरी व 100 क्विंटल वांग्याची भाजी यांच्या महाप्रसादाचा बेत ठेवण्यात आलेला आहे. विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे व विश्‍वस्त मंडळाच्या नेतृत्वात विवेकानंद जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. जन्मोत्सवाच्या नियोजनसाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. आश्रमाच्या मुख्य विचारपीठासमोर 16 हजार चौरस फुटाचा मंडप टाकण्याचे काम वेगात सुरु आहे. या मंडपात विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. तीनही दिवस आश्रमातील विचार पीठावरुन ज्ञानयज्ञ सुरु राहणार असून, नामवंत कीर्तनकार, प्रवचन व व्याख्यानकार आपली सेवा देणार आहेत. तीन दिवसांच्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमानंतर 27 जानेवारी रोजी भव्य महापंगतीने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

त्यासाठी 200 क्विंटल गव्हाच्या पिठापासून बनवलेलया पुर्‍या, 100 क्विंटल वाग्यापासून बनवलेली भाजी यांचा बेत ठेवण्यात आलेला आहे. पुरी भाजीचा हा महाप्रसाद आपल्या अनोख्या चवीसाठी राज्यभरात प्रसिद्ध आहे. तब्बल दोन लाख भाविक या महाप्रसादाचा लाभ घेणार असून, दोन रांगांमधून 100 ट्रॅक्टरद्वारे आणि तीन हजार स्वयंसेवकांच्या मदतीने या महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे. अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांनी दिली आहे.
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी विवेकानंद जन्मोत्सवाचे ऑनलाईन प्रसार यूट्यूबवरील विवेकानंद आश्रम चॅनलसह फेसबुक, ट्विटर आणि विवेकानंद जन्मात्सवाचे ऑनलाईन प्रसारण विवेकानंद आश्रमाच्या विवेकानंद आश्रम डॉट कॉम या वेबसाइटद्वारे केले जाणार असल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली.