हिवरा आश्रम – संशोधक वृत्ती, जिज्ञासा व ध्येयाप्रती एकनिष्ठता असेल तर काही शक्य होवू शकते. याचाच प्रत्यय येथील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या विद्यार्थीनींनी कीड नियंत्रण यंत्र बनवले आहे. अकोला येथे डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत 8 व 9 ऑक्टोबर रोजी झालेल्या आविष्कार 2018 मध्ये विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा आश्रम येथील विद्यार्थीनींच्या कीड नियंत्रण यंत्राची राज्यस्तरीय आविष्कार 2018-19 साठी निवड झाली आहे.
हिवरा आश्रम सारख्या छोट्याशा खेड्यातील विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींनी बनवलेल्या कीड नियंत्रण यंत्राचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे. विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी जान्हवी डोसे, स्नेहा गवई, ऋचा माळी, स्मिता मोरे या विद्यार्थीनींना प्रा.शिवशंकर काकडे, प्रा.पवन थोरहाते यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दरवर्षी शेतकर्‍यांचे माशी, मावा, तुडतुडे, फुलकिडे यापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होते. ही बाब लक्षात घेवून विवेकानंद कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी कीड नियंत्रण यंत्राची टाकाऊ वस्तूपासून या यंत्राची निर्मिती केली आहे. कीड नियंत्रण यंत्राच्या निर्मितीसाठी एक ते दीड हजार खर्च लागतो. या यंत्रांच्या असलेल्या बल्बकडे रात्रीच्या वेळी भरपूर प्रमाणात विविध पिकावरील पतंग, फुलपाखरे, हुमनी अळीचा प्रौढ आकर्षित होवून रॉकेल मिश्रीत पाण्यात पडून मरण पावतात. अशा प्रकारे किडीचे मोठ्या प्रमाणात नियंत्रण होवून कीटकनाशक फवारणीच्या खर्चात बचत होते. तसेच डब्याला दिलेल्या पिवळया व निळ्या रंगाकडे आकर्षित होवून चिकटून मरण पावतात.

असे आहे कीड नियंत्रक यंत्र
चार बाय दोन फूट लोखंडी फ्रेम बनवली. या फे्रमच्या मध्यभागी दोन बाय दोनच्या फे्रम दोन बाजूंनी बेअरिंग असलेल्या रॉडच्या मध्यभागी 15 लिटर तेलाचा रिकामा डब्बा बसवला आहे. या डब्याच्या दोन बाजुला पिवळा रंग तर दुसर्‍या दोन बाजूला निळा रंग असून डब्यामध्ये एक हजार वॅटचा विद्यात बल्ब बसवला आहे. वार्‍याच्या मदतीने हे यंत्र फिरते.