हिवरा आश्रम – श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हजारो पर्यटक, भाविक भक्त मोठ्या संख्येने श्री क्षेत्र हरिहर तीर्थ येथे भगवान शिव व भगवान बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. भल्या पहाटे निसर्गाच्या कुशीत जाताना युवा पिढीसह बच्चे कंपनीसुद्धा दंग होतात. श्रावणसरी बरसल्याने हिरवा शालू परिधान केलेली वसुंधरा व नयनरम्य निसर्ग पाहण्याची अनुभूती काही औरच आहे. हरिहरतीर्थावरील निसर्गरम्य वातावरण श्रावण महिन्यामध्ये अधिकच खुलून जाते. हरी व हराच्या दर्शनासाठी राज्यभरातून अलोट भक्तांची गर्दी श्रावण महिन्यामध्ये हरिहर तीर्थावर होते. हरी व हर यादोन्हीमध्ये भेद नाही. म्हणून वैष्णव व शैवांना एकाच ठिकाणी भगवान बालाजी व भगवान शिवाचे दर्शन सुलभ घेता यावे, यासाठी कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराजांच्या संकल्पनेतून हरिहर तीर्थाची निर्मिती झाली. हरिहर तीर्थक्षेत्र भक्तांच्या श्रद्धेचे अतूट स्थान आहे.
हरिहर तीर्थ वास्तूकलेचा अद्वितीय नमूना आहे. हरिहर तीर्थक्षेत्र येथील भगवान शिव व भगवान बालाजी यांची भव्य मंदिरे आपले वेगळेपण जपत आहेत. रेखीव कलाकृती, आकर्षक रंगछटा, भिंतीवरील भगवान बालाजींची सचित्र कथा पाहून भाविकांचे मन प्रसन्न होते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर दिमाखात उभे असलेले सिंह बाल गोपालांना आकर्षित करुन जातात. शिव पावन धारेमध्ये स्त्रान केल्यानंतर समोर भगवान बालाजी मंदिरात जाणार्या रस्त्यावर सुबक आणि उंच अशी कमान आहे. भगवान बालाजी मंदिर कळपापर्यंत 81 फूट उंच असून, मंदिराचे बांधकाम हेेंमाडपंथी पद्धतीचे आहे. भगवान बालाजीची मूर्ती 13 फूट उंच असून असे शिल्प अन्यत्र नाही. दर्शनासाठी येणार्या सर्व भाविकांना लाडूचा प्रसाद दिला जातो.
Recent Comments