कर्मयोगी संत प.पू.शुकदास महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या श्रीक्षेत्र हरिहरतीर्थावर महाशिवरात्री निमित्त राज्याच्या कान्याकोप-यातून शिव पूजन व दर्शनासाठी भाविक येतात. येणा-या भाविक भक्तांच्या गर्दीने हरिहरतीर्थ फुलून गेले आहे. आज महाशिवरात्री निमित्त हरिहर तीर्थावर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण, रूद्राभिषेक तसेच भाविकांसाठी शाबुदाना खिचडीचे वाटप करण्यात येणार आहे. हरिहर तीर्थावर पावन जलाधारेत स्नान केल्याने चित्त शुध्द होवून मनःशाती लाभते व त्या जलाने अभिषेक केल्याने मनोकामना पुर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे. अत्यंत रम्य परिसर असलेले हरिहर तीर्थक्षेत्र,नानाविध वृक्षांनी नटलेला निसर्ग, भारतीय स्थापत्यकलेचा अद्वितीय नमुना असलेली भव्य भगवान शिव व भगवान बालाजीचे मंदिरे व ५ फुट उंचीची भगवान शंकराची धातूची मूर्ती व १२ फूट उंच काळ्या पाषाणातील भगवान बालाजीची अप्रतिम मूर्ती यांच्या दर्शनाने भाविक देहभान विसरतात. महाशिवरात्री निमित्त दर्शनासाठी येणा-या भाविकांच्या निवासाची व फराळाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली आहे. दिवसभर होणा-या कार्यक्रमात  सकाळी ६ वाजता प्रार्थना, आरती, सकाळी ७ वाजता अनुभूती व भगवद्गीतेवर हभप थुट्टे शास्त्री महाराज यांचे प्रवचन, १० वाजता पुरूषोत्तम आकोटकर यांचे शिवलीलामृताचे वाचन त्यानंतर भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येणार आहे.सायंकाळी ७ वाजता हभप येवले शास्त्री महाराज यांचे भागवत कथा निरूपण  होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात आलेले आहे.