पावणेदोन लाख दर्शकांनी ऑनलाईन पाहिला सोहळा,तीन दिवसांत तब्बल 48 तांस लाईव्ह प्रक्षेपण
येथील विवेकानंद आश्रमाच्यावतीने आयोजित विवेकानंद जन्मोत्सव सोहळ्याने आता जागतिक भरारी घेतली आहे. २५ ते २७ जानेवारी २०१९ असे तीन दिवस हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याचे लाईव्ह प्रदर्शन युट्यूब, फेसबूक व ट्वीटर या सोशल माध्यमांच्याद्वारे विवेकानंद आश्रमाच्या वेब चॅनलमार्फत करण्यात आले होते. तब्बल ४० सलग सत्रांतून एक लाख ७५ हजार दर्शकांनी हा सोहळा ऑनलाईन पाहिला असल्याची नोंद झाली आहे. तीनही दिवस ४८ तांस हे लाईव्ह प्रक्षेपण दाखविण्यात आले होते. केवळ भारतच नव्हे तर युरोप व आशिया खंडातील शहरांत हा सोहळा ऑनलाईन पाहिला गेल्याची माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली.
विवेकानंद आश्रमाच्या मीडिया व पब्लिक रिलेशन विभागाच्यावतीने विवेकानंद आश्रमाचे प्रचार-प्रसार कार्य चालविले जाते. हाच विभाग आश्रमाचे वेब चॅनेल तसेच लाईव्ह प्रक्षेपणाचे काम पाहतो. विवेकानंद जन्मोत्सव हा जगभर प्रसिद्धीस पावलेल्या महोत्सव असून, या सोहळ्यासाठी राज्यभरासह विदेशातील विविध भागातून भाविक येत असतात. शेवटच्या दिवशी बसणारी महापंगत ही आता जगभर कुतूहलाचा विषय बनली आहे. देश-विदेशातील भाविकांसह राज्यातील भाविकांना हा सोहळा ऑनलाईन पाहाता यावा, यासाठी तीनही दिवस अहोरात्र प्रक्षेपण केले जाते. त्यानुसार दि. २५ ते २७ जानेवारी २०१९ दरम्यान तब्बल ४० सलग सत्रांतून दिवसाचे १६ तांस असे तीन दिवसांत ४८ तांस या सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले. या तीनही दिवस मिळून एक लाख ७५ हजार दर्शकांनी हा सोहळा स्मार्टफोन, संगणक, टॅब वा तत्सम साधनांद्वारे पाहिला आहे. त्यामध्ये बहुतांश दर्शक हे युरोप व आशिया खंडातील आहेत. गतवर्षी हा संख्या पाऊण लाखाच्या घरात होती.
विवेकानंद जन्मोत्सवानिमित्त तीनही दिवस धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. या कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण इंटरनेटद्वारे दाखविण्यात आले, तद्वतच ते राष्ट्रीय वृत्तवाहिन्या व स्थानिक वाहिन्यांद्वारेही दाखविण्यात आले होते. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत विवेकानंद आश्रमाला सरासरी दोन लाख दर्शक लाभले असल्याचेही आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी सांगितले. तसेच, या सोहळ्यासाठी तब्बल अडिच लाख भाविकांची उपस्थिती पाहाता, साधारणतः साडेचार लाख भाविकांनी विवेकानंद जन्मोत्सवाचा लाभ घेतला असेही निदर्शनास येते, असेही श्री गोरे म्हणाले.

सोहळा जगभर पोहोचत असल्याचा आनंद
युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांचे विचार, पू. शुकदास महाराज यांचे कार्य आणि त्यांचा मानवहितैषी संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विवेकानंद जन्मोत्सव सोहळा हा प्रमुख उपक्रम आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा सोहळा जगभर पोहोचत असल्याने विवेकानंद आश्रमाचे कार्य सर्वदूर पोहोचत असल्याबाबत विशेष आनंद वाटतो.
आर. बी. मालपाणी,अध्यक्ष विवेकानंद आश्रमाचे