हिवरा आश्रम ता. मेहकर – विवेकानंद आश्रमाचे संस्थापक तथा कर्मयोगी पू.शुकदास महाराज यांचे विवेकानंद आश्रमातील बहुप्रतिष्ठीत स्मृती स्मारक 2020 पर्यंत पूर्णत्वास जाईल, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष तथा भगवतगीतेचे चिंतनकार आर.बी.मालपाणी यांनी महाराजश्रींच्या हरिक महोत्सव जन्मोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलतांना दिली. या स्मारकासाठी सरासरी साडेचार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी गावोगावचे ग्रामस्थ आपला खारीचा वाटा उचलत असून, महाराजांच्या स्मारकासाठी लोकवर्गणी पाठवित आहेत.
आश्रमाचे ज्येष्ठ विश्‍वस्त महाराजश्रींचे निकटवर्तीय दादासाहेब मानघाले यांनी आपल्या आयुष्याची संपूर्ण पुंजी तब्बल 41 लाख रुपये या स्मारकासाठी दान दिले आहेत. या स्मारकाचे निर्मानाधिन काम विदेशी बांधकाम संस्थेला देण्यात येणार असून, विदर्भाच्या भूमितील हे सर्वांत सुंदर असे वास्तुशिल्प ठरणार आहे, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी यांनी दिली आहे.
महाराजांचे स्मारक अंभाजी मार्बल या उच्चप्रतीच्या शुभ्र दगडात बांधले जाणार असून, राजस्थानात आढळणार्‍या या दगडाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी मागणी असते. भारतात मंदिरे, मशिदी, चर्च बांधण्यासाठी हाच दगड पुरातन काळापासून वापरला जाता आहे. तर विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवेद्वार हे बन्सीपहाड या राजस्थानी लाल रंगाच्या दगडात बांधले जाणार आहे.
स्मारकाची निर्मिती करताना आश्रमाच्या विद्यमान परिसरात बदल केला जाणार असून, बगिचा, लॉन, कारंजे यांच्यासह विविध सुशोभीत झाडवेलींनी स्मारकाचे सौदर्य खुलविले जाणार आहे.
स्मारकासाठी मुंबई येथील उद्योगपती व विवेकानंद आश्रमाचे विश्‍वस्त एकनाथराव दुधे यांनी पुढाकार घेतलेला आहे. सरासरी साडेचार कोटी रुपयांचा खर्च या स्मारकासाठी अपेक्षित आहे.

विवेकानंद स्मारकाचे काम पूर्णत्वास
पू.शुकदास महाराज यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या विवेकानंद स्मारकाचे काम पूर्णत्वास गेले आहे. कोराडी जलाशयात हे स्मारक निर्माण केले गेले असून, राज्य शासनाने त्यासाठी एक छोटसे बेट विवेकानंद आश्रमास दिलेले आहे. तसेच हरिहरतीर्थावरील बालाजी मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. परिसरातील गोरगरिबांच्या मुलींसाठी माफक दरात चालविले जाणारे गेर्ल्स हॉस्टेल असावे, अशी महाराजश्रींची इच्छा होती. त्या होस्टेलचेही काम पूर्ण झाले असून, गोरगरिब मुलींना त्याचा लाभ होणार आहे, अशी माहिती विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी दिली.